५२ वर्षांनंतर पुन्हा भरली मैत्रीची शाळा! पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाच्या १९७४ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा


प्रमोद दांगट – प्रतिनिधी 

पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय, निरगुडसर येथील १९७४ साली दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी तब्बल ५२ वर्षांनंतर एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला. आयुष्याच्या प्रवासात आपापल्या क्षेत्रात स्थिरस्थावर झालेल्या या मित्रांनी पुन्हा एकदा एकत्र येत मैत्रीचा अनोखा आनंद अनुभवला. या स्नेहमेळाव्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि जुन्या आठवणींचा ओलावा पाहायला मिळाला.

या माजी विद्यार्थ्यांनी दहावीच्या वर्गमित्रांचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून एकमेकांशी संपर्क साधला. त्यानंतर सर्वांना एकत्र आणण्यासाठी उद्योजक नामदेव थोरात, भालचंद्र रणपिसे, केशव बढेकर, सुदाम शिंदे, हनुमंत टाव्हरे, शरद वाव्हळ आणि सोनभाऊ ढोबळे यांनी विशेष नियोजन केले. १९७४ च्या या बॅचमधील विद्यार्थ्यांनी पुणे येथील भुगावमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या विरंगुळा केंद्रात दोन दिवस मुक्काम करत सहलीचा आनंद घेतला. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या केंद्रात सर्व मित्रांनी एकत्र वेळ घालवला. यावेळी शालेय जीवनातील गमतीजमती, जुन्या आठवणी, सुख-दुःख आणि आयुष्यातील विविध अनुभवांना उजाळा देण्यात आला.

या बॅचमधील अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षणानंतर विविध क्षेत्रांत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. उद्योजक नामदेव शेठ थोरात यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता १९९७ मध्ये निरगुडसर येथे शेतकऱ्यांची गरज ओळखून सारथी दूध डेअरीची स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी निरगुडसर गाव व परिसरातील दूध उत्पादक शेतकरी, तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. सध्या ते विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून कार्यरत असून शेतकऱ्यांच्या अडीअडचणीच्या काळात मदतीसाठी नेहमी पुढाकार घेत असतात. त्याचप्रमाणे कैलास बढेकर यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त करून बांधकाम क्षेत्रात मोठे नाव कमावले आहे. पुण्यासारख्या शहरात बडेकर ग्रुपच्या माध्यमातून अनेक ठिकाणी उंच इमारतींची उभारणी करून सर्वसामान्य नागरिकांचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी योगदान दिले आहे. या बॅचमधील अनेक जण उद्योग, व्यवसाय, व्यापार तसेच शेती क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत.

विशेष म्हणजे, आयुष्याच्या या टप्प्यावर पोहोचूनही या मित्रांनी आपली मैत्री जपली आहे. तब्बल ५२ वर्षांनंतर पुन्हा भेटलेल्या मित्रांनी एकमेकांच्या सुख-दुःखांची विचारपूस केली. शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत जुन्या मैत्रीचा आनंद मनमुराद लुटला. या स्नेहमेळाव्याचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, ज्या पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयात शिक्षण घेऊन आयुष्याची वाटचाल सुरू केली, त्या विद्यालयासाठी भविष्यात योगदान देण्याचा निर्णय सर्व माजी विद्यार्थ्यांनी घेतला. वय वाढले, काळ बदलला; मात्र मैत्रीचा धागा तसाच कायम राहिला. ५२ वर्षांनंतर पुन्हा एकत्र आलेल्या या मित्रांचा स्नेहमेळावा जुन्या मैत्रीची आणि शाळेच्या ऋणानुबंधांची सुंदर आठवण ठरला.