पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा ; ५३० विद्यार्थ्यांनी घेतला पुस्तक वाचनाचा आनंद


प्रमोद दांगट – प्रतिनिधी

निरगुडसर, ता. आंबेगाव : विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यातील ज्ञानाची व्याप्ती वाढावी आणि पुस्तकांशी मैत्री अधिक दृढ व्हावी, या उद्देशाने निरगुडसर (ता. आंबेगाव) येथील पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. श्री गुरुदेवदत्त वाचनालय, ग्रामपंचायत निरगुडसर यांच्या वतीने आयोजित या उपक्रमात विद्यालयातील तब्बल ५३० विद्यार्थ्यांनी सहभागी होत विविध पुस्तकांचे सामूहिक वाचन केले.

वाचन हे ज्ञानप्राप्तीचे प्रभावी माध्यम असून पुस्तकांमुळे विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना मिळते. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, त्यांना विविध विषयांचे ज्ञान मिळावे आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास व्हावा, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी वाचनालयातील विविध विषयांवरील पुस्तके विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. विद्यालयातील ५३० विद्यार्थ्यांनी एकत्र बसून विविध पुस्तकांचे वाचन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकांच्या माध्यमातून नवनवीन माहिती जाणून घेण्याची संधी मिळाली. मोबाईल आणि डिजिटल माध्यमांच्या वाढत्या वापराच्या काळात विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचनासाठी वेळ द्यावा, वाचनाची सवय लावून घ्यावी आणि ज्ञानाच्या कक्षा रुंदावाव्यात, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला असल्याचे विद्यालयाचे प्राचार्य कांताराम टाव्हरे यांनी सांगितले

यावेळी ग्रामपंचायत अधिकारी ज्योती वेताळ यांनी भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या वाचनाच्या ध्यासावर प्रकाश टाकला. डॉ. कलाम हे भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ आणि ‘मिसाईल मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जातात. त्यांच्या जीवनातील वाचनाचे महत्त्व आणि ज्ञान संपादनासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला निरगुडसर गावचे उपसरपंच भाऊसाहेब वळसे पाटील, ग्रामपंचायत सदस्य वैभव वळसे पाटील, विद्यालयाचे प्राचार्य कांताराम टाव्हरे, पर्यवेक्षक संतोष वळसे, शिक्षक येवले सर, दरेकर सर, वाबळे मॅडम, कोकणे मॅडम, ग्रामपंचायत ग्रंथालयाच्या ग्रंथपाल सुनीता जाधव, ग्रामपंचायत कर्मचारी कैलास टाव्हरे आणि राजश्रीताई वळसे पाटील उपस्थित होते.