अवसरी खुर्द शासकीय महाविद्यालयात पाणीटंचाईने विद्यार्थिनींचे आंदोलन; अखेर पाणीपुरवठा सुरळीत


प्रमोद दांगट – प्रतिनिधी 

अवसरी खुर्द ता.आंबेगाव येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहात रविवार दि. १६ पासून वापरासाठी पाणी उपलब्ध नसल्याने संतप्त विद्यार्थिनींनी गुरुवारी दि. २० रोजी रात्री रिकाम्या बादल्या हातात घेऊन आंदोलन केले. या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेत युद्धपातळीवर हालचाली करून शुक्रवारी दि. २१ रोजी दुपारी पाणीपुरवठा सुरळीत केला.

महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहात चार इमारती असून, सुमारे २१९ विद्यार्थिनी वास्तव्यास आहेत. वसतिगृहाला दररोज दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, रविवारी सकाळपासून पाणीपुरवठा बंद झाला. यापूर्वीही पाणीपुरवठा अनियमित होत असल्याने विद्यार्थिनींना त्रास सहन करावा लागत होता. गुरुवारी टँकरच्या फेऱ्या उशिरा सुरू झाल्याने विद्यार्थिनींचा संयम सुटला. सायंकाळी सातच्या सुमारास विद्यार्थिनींनी रिकाम्या बादल्या हातात घेत तसेच विविध मागण्यांचे फलक घेऊन वसतिगृहासमोर ठिय्या आंदोलन केले. प्रशासनाच्या विविध विभागांचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. यावेळी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देण्यात आले.अशी माहिती. किमया भोसले,अनुश्री काळे ,श्रद्धा शेळके, ज्ञानेश्वर जंगले ,अन्विता वेताळ. यांनी दिली.

आश्वासनानंतर शुक्रवारी सकाळपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पथकाने जेसीबी व १६ कामगारांच्या मदतीने वसतिगृहाकडे येणाऱ्या पाइपलाइनची तपासणी सुरू केली. पाच ठिकाणी खोदकाम करून पाइपलाइन तपासण्यात आली. पाइपमध्ये रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, दगड व कचरा आढळून आला. तसेच व्हॉल्वमध्येही कचरा साचल्याचे निदर्शनास आले. कामगारांनी पाइपलाइन व व्हॉल्वमधील कचरा काढून आवश्यक दुरुस्ती केली. त्यानंतर दुपारी साडेतीन ते पावणेचारच्या सुमारास मुख्य टाकीत उच्च दाबाने पाणी सोडण्यात आले. त्यानंतर वसतिगृहाचा पाणीपुरवठा सुरळीत झाल्याची माहिती महाविद्यालय प्रशासनाने दिली. दरम्यान शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होऊन सुमारे १८ वर्षे झाली आहेत. चांडोली खुर्द येथील घोड नदीपासून महाविद्यालयापर्यंतची सुमारे आठ किलोमीटर लांबीची जलवाहिनी जुनी झाली आहे. त्यामुळे या जलवाहिनीचे सर्वेक्षण करून आवश्यकतेनुसार नवीन पाइपलाइन टाकण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम घोडेगावचे उपअभियता सूर्यकांत कुंभार यांनी दिली.