अवसरी येथील ५०० केव्हीए ट्रान्सफॉर्मर फोडून तांब्याची कॉईल चोरीला ; २ लाख ३४ हजारांचे नुकसान


प्रमोद दांगट – प्रतिनिधि 

आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील शासकीय अभियांत्रिकी संशोधन महाविद्यालय परिसरात असलेला ५०० केव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर फोडून त्यातील तांब्याची तार गुंडाळलेली कॉईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना बुधवार (दि. ११ नोव्हेंबर २०२६) रोजी सकाळी उघडकीस आली. या चोरीमध्ये सुमारे २ लाख ३४ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार मंचर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत अक्षय सिताराम टाव्हरे (वय ३८, रा. अवसरी बुद्रुक, ता. आंबेगाव ) यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. टाव्हरे हे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये लाईनमन म्हणून कार्यरत असून गेल्या चार महिन्यांपासून अवसरी गावात त्यांची नेमणूक आहे.

फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार, बुधवार दि. ११ नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास शासकीय अभियांत्रिकी संशोधन महाविद्यालयाचे इलेक्ट्रिशियन निलेश हिले यांनी फोन करून महाविद्यालय परिसरातील ट्रान्सफॉर्मर फोडल्याची माहिती दिली. त्यानंतर टाव्हरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, ५०० केव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर फोडून त्यातील तांब्याची तार गुंडाळलेली कॉईल चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. तसेच ट्रान्सफॉर्मरमधील ऑईल खाली पडून नुकसान झाल्याचेही दिसून आले. या घटनेची माहिती त्यांनी वरिष्ठ अधिकारी रुपेश फंदी यांना दिली. त्यानंतर मंचर पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दाखल केली. चोरीस गेलेल्या तांब्याच्या कॉईलची किंमत अंदाजे २ लाख ३४ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत अधिनियम २००३ मधील कलम १३६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार गिलबिले करीत आहेत.