मुलाच्या लग्नासाठी मुलगी दाखवण्याच्या बहाण्याने फसवणूक ; घोडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल


प्रतिनिधी – प्रमोद दांगट 

मुलाच्या लग्नासाठी मुलगी दाखवण्याच्या बहाण्याने एका कुटुंबाची ४० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार घोडेगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूर्यकांत काळे यांनी फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील मोल मजुरी करणारे सूर्यकांत काळे यांच्या मुलाचे लग्न करण्यासाठी ते मुली पाहत होते. घोडेगाव येथील त्यांच्या ओळखीची नसिम शहाबुद्दिन मुंढे ही महिला त्यांच्या पत्नीची मैत्रीण होती व घरी नेहमी येत असे तिने सूर्यकांत काळे यांना सांगितले की माझी बहीण पुण्यात आहे. ती लग्न जमवण्याचे काम करते तुमच्या मुलासाठी तिला मुलगी पाहण्यास सांगते पण ती लग्न जमवण्याचे पैसे घेते असे सांगितले. सूर्यकांत काळे यांनी होकार दिल्यानंतर दि. ९/२/२०२६ रोजी नसीम मुंढे ही महिला फिर्यादी काळे यांच्या घरी आली व माझी बहीण आमिना सय्यद हिने तुमच्या मुलासाठी मुलगी पाहिली आहे पण मुलीचा फोटो पाहण्यासाठी ५ हजार रुपये तिच्या मोबाईलवर पाठवावे लागतील असे सांगितले. फिर्यादीने ग्राहक सुविधा केंद्रात जाऊन पाच हजार रुपये ऑनलाईन पाठवले. मुलीचा फोटो पाहून मुलगी पसंत आहे. घोडेगाव येथील एका मंदिरात दि.८/३/२०२६ रोजी लग्न करू असे ठरले. त्यावेळी आमिना सय्यद हिने मुलीला नातेवाईक नाही तिचा सांभाळ मीच केला आहे. त्यामुळे मी तिचे लग्न लावून देणार आहे असे सांगितले. ठरल्याप्रमाणे दि.८ रोजी आमीना सय्यद तिची बहीण नसीम मुंढे हे मुलीला लग्नासाठी घेऊन आले मात्र लग्न लावण्यापूर्वी आधी आणखी ३५ हजार रुपये देण्याची मागणी त्यांनी केली. त्यानुसार तक्रारदाराने ३५ हजार रुपये रोख दिले. त्यानंतर दोन्ही महिला मुलीला घेऊन मंदिरात आल्या. तेथे काळे यांच्या मुलाचा मुलीशी हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे विवाह लावण्यात आला. मात्र, लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी अमीना सय्यद ही काहीही न सांगता काळे यांच्या मूलाशी लग्न केलेल्या मुलीला घेऊन निघून गेले. याबाबत आमिना सय्यद हिला वारंवार विचारणा केल्यानंतर तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर फिर्यादी सूर्यकांत काळे यांनी लग्नासाठी दिलेल्या पैशांची परत मागणी केली. मात्र, पैसे परत देण्यास नकार देण्यात आला. तसेच, पैसे मागितल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. ४० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी आमीना जमालुद्दीन सय्यद (रा. कोंढवा, पुणे) आणि नसिम शहाबुद्दीन मुंढे (रा. घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे) यांच्याविरुद्ध घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.