
प्रमोद दांगट – प्रतिनिधी
पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजने अंतर्गत शेतात, घरावर, फार्महाऊसवर सोलर पॅनल बसवून देण्याच्या बहाण्याने आंबेगाव तालुक्यातील नागरिकांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक घटना उघडकीस आले आहे. याप्रकरणी दिनांक ६ ऑगस्ट २०२६ रोजी घोडेगाव पोलीस ठाण्यात राजेंद्र महादेव बोऱ्हाडे (मूळ रा. घोडेगाव ता. आंबेगाव, सध्या रा. आळेफाटा ता. जुन्नर) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी लक्ष्मण काचोळे यांनी आपल्या फार्महाऊसवर ३ केव्ही क्षमतेचा सोलर पॅनल बसवण्यासाठी राजेंद्र बोऱ्हाडे याच्याशी संपर्क साधला होता. त्यावेळी राजेंद्र बोऱ्हाडे यांनी मी जुन्नर आंबेगाव तालुक्यामध्ये पंतप्रधान सूर्यघर मुक्त बिजली योजना या योजनेतून लोकांना सोलर बसवून देण्याचे काम करतो मी आजपर्यंत या भागात खूप कामे केली आहे. या योजनेत काम पूर्ण झाल्यानंतर ७८ हजार रुपये शासनाकडून सबसिडी मिळते. माझ्याकडे या योजनेचा अधिकृत परवाना असून सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व कागदपत्रे मी स्वतः तयार करून देतो तसेच संपूर्ण प्रक्रिया मीच पूर्ण करून तुमच्या फार्म हाऊस वर २ महिन्याच्या आत सोलर पॅनल बसून देतो असे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला व फिर्यादी कडून ६ मार्च रोजी सोलर साहित्य खरेदीसाठी १ लाख ७० हजार रुपये घेतले. पैसे घेऊनही दोन महिन्यांत कोणतेही काम न करता बोऱ्हाडे याने काम करण्यास टाळाटाळ करत त्याचा फोन बंद केला. फिर्यादी काचोळे यांनी अधिक चौकशी केली असता, राजेंद्र बोऱ्हाडे याने परिसरातील अनेक नागरिकांची अशाच प्रकारे फसवणूक केल्याचे लक्षात आले.
राजेंद्र बोऱ्हाडे याने फिर्यादी १) लक्ष्मण मनाजी काचोळे यांच्याकडून १ लाख ७० हजार, २) महेश सिताराम ढमढेरे रा. पिंपळगाव घोडा ता. आंबेगाव यांच्याकडून ४ लाख ०८ हजार, ३) भिवाजी श्रीपत लांडे रा. लांडेवाडी ता. आंबेगाव यांच्याकडुन १,७१,५००/- रुपये, ४) राजाराम कोंडीबा साळवे रा. डिंभे बुद्रुक ता. आंबेगाव यांच्याकडुन ४६,५००/- रुपये, ५) सौ. भारती माणिक जाधव रा. घोडेगाव ता. आंबेगाव यांच्याकडुन २,३६,२७४/- रुपये, ६) अतुल धोंडीबा भवारी रा. गोहे बुद्रक ता. आंबेगाव यांच्याकडुन १,३०,०००/- रुपये, ६) सुनिल सुर्यकांत झोडगे रा. घोडेगाव ता. आंबेगाव जि.पुणे यांच्याकडुन ८२,०००/- रुपये असे एकुण १२,४४,२७४/- रुपये रोख तसेच गुगल पे, फोन पे व्दारे अँडवान्स पैसे स्वीकारत अनेकांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी राजेंद्र बोऱ्हाडे याच्यावर घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश पवार करत आहे.



