सोन्याच्या नावाखाली चांदीचे दागिने ठेवून कर्ज उचलले ; पतसंस्थेची ९ लाख ४१ हजारांची फसवणूक


प्रमोद दांगट – प्रतिनिधी 

सोन्याचे दागिने असल्याचे भासवून प्रत्यक्षात चांदीचे दागिने पतसंस्थेत तारण ठेवत तब्बल ९ लाख ४१ हजार ५०० रुपयांचे कर्ज उचलून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिवराम गायकर (वय ६०, रा. वारूळवाडी, ता. जुन्नर) यांनी मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आंबेगाव तालुक्यातील श्री आंबिका ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या महाळुंगे पडवळ शाखेत ८ जून २०२६ रोजी सचिन राधाकिसन मोरे (रा. नांदूर, ता. आंबेगाव, जि. पुणे) हे खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे घेऊन आले होते. त्यानंतर त्यांनी पतसंस्थेचे सभासदत्व स्वीकारले. त्याच दिवशी त्यांनी ३८ ग्रॅम ६०० मिली वजनाचे दागिने सोने तारण कर्जासाठी ठेवले. पतसंस्थेतील सोने मूल्यांकन करणारे कर्मचारी किरण सूर्यकांत दहीवाळ यांनी या दागिन्यांचे मूल्यांकन केले. त्यानुसार व्यवस्थापक योगेश गावडे यांनी ३ लाख १४ हजार ५०० रुपयांचे कर्ज मंजूर करून ही रक्कम सचिन मोरे यांच्या बचत खात्यावर जमा केली. त्यानंतर १६ जून २०२६ रोजी सचिन मोरे यांनी पुन्हा ७६ ग्रॅम ९०० मिली वजनाचे दागिने तारण ठेवून ६ लाख २७ हजार रुपयांचे कर्ज घेतले. अशा प्रकारे त्यांनी दोन वेळा मिळून एकूण ९ लाख ४१ हजार ५०० रुपयांचे सोने तारण कर्ज घेतले.

दरम्यान, काही दिवसांनंतर पतसंस्थेतील सोने मूल्यांकन करणारे किरण सूर्यकांत दहीवाळ यांनी फोन करून तारण ठेवलेल्या दागिन्यांबाबत शंका उपस्थित केली. त्यानंतर तक्रारदारांनी संबंधित व्यक्तीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, समाधानकारक माहिती मिळाली नाही. त्यामुळे पतसंस्थेच्या अधिकाऱ्यांनी तारण ठेवलेल्या दागिन्यांचे पुन्हा मूल्यांकन केले. या पुनर्मूल्यांकनात तारण ठेवलेल्या दागिन्यांमध्ये केवळ २२.५७ टक्के सोने, तर ७७.२६ टक्के चांदी असल्याचे आढळून आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. सचिन मोरे यांनी दिलेल्या कागदपत्राचे नुसार त्याच्या पत्त्यावर जाऊन चौकशी केली असता नांदुर येथे असा कुठलाही व्यक्ती राहत नसल्याचे सांगण्यात आले. तसेच त्यांनी दिलेली कागदपत्रे खोटी असल्याचे तक्रारीत सांगण्यात आले असून सोन्याच्या नावाखाली खोटे दागिने तारण ठेवून पतसंस्थेची आर्थिक फसवणूक करण्यात आली असल्याचे लक्षात आले. सचिन राधाकिसन मोरे यांनी खोटे सोने तारण ठेवून पतसंस्थेचे ९ लाख ४१ हजार ५०० रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप करत राजेंद्र गायकर यांनी मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मंचर पोलीस करीत आहेत.