उरुळी कांचनचे सुपुत्र खलिल शेख दख्खन इतिहास संशोधक संस्थेच्या विश्वस्तपदी


उरुळी कांचन – प्रतिनिधी

उरुळी कांचन येथील इतिहास संशोधक व सुप्रसिद्ध सर्पमित्र खलिल शेख यांची दख्खन इतिहास संशोधक संस्था, पुणे महाराष्ट्र यांच्या विश्वस्तपदी निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या अलीकडेच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

खलिल शेख हे गेल्या अनेक वर्षांपासून दख्खनचा इतिहास, स्थानिक वारसा, गडकोट, शिलालेख व लोकइतिहास यावर सातत्याने संशोधन करत आहेत. त्यांच्या अभ्यासपूर्ण लेखनामुळे व संशोधनात्मक कार्यामुळे त्यांना इतिहासप्रेमी व अभ्यासकांमध्ये विशेष मानाचे स्थान आहे. तसेच सर्पमित्र म्हणूनही त्यांनी सामाजिक कार्यात मोलाची भूमिका बजावली असून वन्यजीव संरक्षण व जनजागृतीच्या कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. दख्खन इतिहास संशोधक संस्थेच्या माध्यमातून ऐतिहासिक संशोधनाला चालना देणे, दुर्मीळ दस्तऐवजांचे जतन करणे व नव्या पिढीला इतिहासाच्या अभ्यासाकडे आकर्षित करणे हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. खलिल शेख यांच्या निवडीमुळे संस्थेच्या कार्याला नवी दिशा व बळ मिळेल, असा विश्वास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या निवडीबद्दल उरुळी कांचन परिसरातील नागरिक, इतिहासप्रेमी व विविध सामाजिक संघटनांनी खलिल शेख यांचे अभिनंदन केले आहे.