दागिने, रोख रक्कम, सह जमिनीची कागदपत्र असलेली पिशवी देखील चोरट्यांनी पळवली
महाळुंगे पडवळ ता. आंबेगाव या ठिकाणी सुभाष आत्माराम पडवळ वय ६७ यांच्या घरात चोरी झाल्याची घटना दि.५/५/२०२५ रोजी रात्री १० ते दि.६/५/२०२५ रोजी पहाटे ६ वाजताचे दरम्यान घरफोडी झाली असल्याची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडी कोयंडा, कुलूप तोडून घरात प्रवेश करत कपाटाचा दरवाजा उचकटून कपाटातील ६३ हजार रुपये रोख रक्कम, ५० हजारांची सोन्याची अंगठी, २५ हजाराची कानातील वेल, १० हजार रुपयांची सोन्याची नथ, ४० हजार रुपये किमतीची चांदीची साखळी व चांदीच्या पट्ट्या, असा एकूण १ लाख ८८ हजार रुपयांच्या मुद्देमाल चोरून नेला आहे. याबाबत सुभाष पडवळ यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार मांडवे पुढील तपास करत आहे.
प्रमोद दांगट – प्रतिनीधी