
१७ महिलांच्या एकजुटीतून साकारला गृहउद्योग ; साजूक तुपातील दिवाळी फराळाला परदेशातूनही मागणी
प्रमोद दांगट – प्रतिनिधी
महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी एकत्र येत स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारला, तर त्यातून यशस्वी उद्योग उभा राहू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे श्री दत्तकृपा महिला बचत गटांतर्गत सुरू करण्यात आलेला ‘गोदाई फूड्स’ हा गृहउद्योग होय. पारंपरिक चवीचा वारसा जपत साजूक तुपात तयार केलेले दिवाळी फराळाचे विविध पदार्थ, लाडू, मिठाई आणि इतर खाद्यपदार्थ तयार करून या गटातील महिला आर्थिक स्वावलंबनाकडे यशस्वी वाटचाल करीत आहेत. अवघ्या चार वर्षांत या गृहउद्योगाने वर्षाकाठी सुमारे ८ लाख रुपयांची उलाढाल करण्याचा टप्पा गाठला आहे.
श्री दत्तकृपा महिला बचत गटामध्ये एकूण १७ महिला कार्यरत असून, त्यांच्या एकजुटीतून आणि मेहनतीतून ‘गोदाई फूड्स’ या गृहउद्योगाची उभारणी करण्यात आली आहे. या उद्योगाच्या माध्यमातून सध्या दिवाळी फराळाच्या विविध पदार्थांची निर्मिती केली जात आहे. यामध्ये साजूक तुपातील बेसन लाडू, दामटीचे लाडू, रवा लाडू, करंजी, स्पेशल ड्रायफ्रूट लाडू, भाजणीची चकली, गोड शंकरपाळी, स्पेशल चिवडा, खारी शंकरपाळी तसेच अनारसे पीठ अशा पारंपरिक आणि रुचकर पदार्थांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, ग्राहकांच्या सोयीसाठी साजूक तुपातील एक किलोचा दिवाळी फराळ गिफ्ट बॉक्स अवघ्या ५६० रुपयांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. या फराळाला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, मंचर येथील ‘केक व्हिला शॉप’मध्येही गोदाई फूड्सचे दिवाळी फराळाचे पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
वर्षभर विविध खाद्यपदार्थांची निर्मिती
केवळ दिवाळीपुरता मर्यादित न राहता या गृहउद्योगामार्फत वर्षभर विविध खाद्यपदार्थ तयार केले जातात. यामध्ये मासवडीचे जेवण, पौष्टिक लाडू, सांजोऱ्या, उकडीचे मोदक तसेच लग्नसमारंभासाठी लागणारे रुखवताचे पदार्थ तयार केले जातात. लग्नसराईच्या काळात रुखवताच्या ऑर्डर मोठ्या प्रमाणावर स्वीकारल्या जातात. यामध्ये सांजोऱ्या, पाच प्रकारचे लाडू, दिवाळी फराळ, शेवयाची वेणी आदी पारंपरिक पदार्थ तयार करून दिले जातात. गणेशोत्सवाच्या काळात उकडीच्या मोदकांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. तसेच दिवाळी फराळ आणि विविध प्रकारच्या लाडूंना परदेशातूनही मागणी असल्याने या महिला बचत गटाच्या उत्पादनांची चव आता स्थानिक पातळीपलीकडे पोहोचली आहे.
शासकीय योजनेतून मिळाले आर्थिक पाठबळ
या गृहउद्योगाच्या उभारणी आणि विस्तारासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ मिळाला आहे. बँक ऑफ बडोदामार्फत या बचत गटाला १ लाख ७५ हजार रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले असून, या कर्जावर ३५ टक्के अनुदान देण्यात आले आहे. शासकीय योजनेतून मिळालेल्या आर्थिक पाठबळाचा उपयोग करून महिलांनी आपल्या पारंपरिक पाककलेला व्यावसायिक स्वरूप दिले आहे.
अधिकाऱ्यांकडून गृहउद्योगाची दखल
श्री दत्तकृपा महिला बचत गटाने चार वर्षांत केलेल्या प्रगतीची विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही दखल घेतली आहे. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, रमेश चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकारचे सहाय्यक सचिव तथा आयएएस अधिकारी अमोल आवटे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे सचिव मंगेश शिंदे तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू यांनी या बचत गटाला भेट देऊन गृहउद्योगाच्या कामकाजाची पाहणी केली आहे. या बचत गटाच्या अध्यक्षा सौ. दया वाघमारे, उपाध्यक्षा सौ. आशा मुळे यांच्यासह सौ. लक्ष्मी वाघमारे, सौ. कीर्ती वाघमारे, सौ. मोहिनी वाघमारे, सौ. वंदना भालेराव आणि सौ. प्रीती वाघमारे या महिला गृहउद्योगाच्या कामकाजात सक्रिय सहभाग घेत आहेत.
महिलांच्या कष्टाला मिळाली यशाची गोडी!
पारंपरिक खाद्यपदार्थांची चव, साजूक तुपाचा वापर, गुणवत्तेला दिलेले प्राधान्य आणि ग्राहकांचा विश्वास या जोरावर ‘गोदाई फूड्स’ने अल्पावधीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली असून, त्यांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्याबरोबरच स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा आत्मविश्वासही मिळाला आहे. महिलांनी एकत्र येऊन जिद्द, मेहनत आणि नियोजनाच्या बळावर उभारलेला हा गृहउद्योग ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरणाचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. पारंपरिक पाककलेला उद्योगाची जोड देत १७ महिलांनी साधलेली ही यशस्वी वाटचाल निश्चितच इतर महिला बचत गटांसाठी प्रेरणादायी आहे.



