
मोरया सामाजिक ट्रस्टच्या माध्यमातून गरजवंतांची सेवा आणि सामुदायिक विवाह सोहळ्यांवर देणार भर
प्रमोद दांगट – प्रतिनिधी
राजकारणातील सध्याची परिस्थिती, बदलती राजकीय संस्कृती आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांकडे होणारे दुर्लक्ष या पार्श्वभूमीवर स्पष्टवक्ते आणि सरळ विचारसरणीचे कार्यकर्ते रमेश भाऊ शिवाजीराव येवले यांनी आपल्या राजकीय विचारसरणीला आणि राजकीय वाटचालीला कायमचा ब्रेक देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक जाहीर निवेदन प्रसिद्ध करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
या निवेदनात येवले यांनी म्हटले आहे की, सध्याची राजकीय परिस्थिती आपण सर्वजण पाहत आहोत. असंवेदनशील राजकारणाच्या रेट्यात सर्वसामान्य जनता भरडली जात असून समाज भरकटत चालला आहे. आपली समाजरचना ढासळताना दिसत आहे. राजकारणातील तत्त्वांचा आणि मूल्यांचा स्तर दिवसेंदिवस घसरत आहे. अशा वातावरणात स्पष्ट बोलणाऱ्या आणि सरळ विचारसरणीच्या कार्यकर्त्याची होणारी कोंडी आपणही अनुभवली आहे. तत्त्वांशी तडजोड करून राजकारणात टिकून राहणे आपल्या स्वभावात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या सर्व गोष्टींचा सखोल विचार करून आपल्या राजकीय विचारसरणीला आणि राजकीय वाटचालीला कायमचा ब्रेक देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. मात्र, हा शेवट नसून सेवेची नवी सुरुवात असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले आहे. यापुढे मोरया सामाजिक ट्रस्टच्या माध्यमातून समाजसेवेसाठी आपला वेळ आणि शक्ती पूर्णपणे देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये अडचणीत असलेल्या प्रत्येक कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून गरजवंतांची सेवा करणे, तसेच सर्वसामान्य कुटुंबातील मुला-मुलींचे विवाह सन्मानाने आणि आनंदाने पार पाडण्यासाठी सामुदायिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करणे, असे सामाजिक उपक्रम राबविण्यावर भर राहणार आहे.
राजकारण सोडत असलो तरी माणसे सोडणार नाही. सुख-दुःखात यापूर्वी जसे सोबत होतो, तसेच यापुढेही सोबत राहणार आहे. आजवर कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि हितचिंतकांनी दिलेली साथ, विश्वास आणि प्रेम हीच आपली खरी कमाई असल्याची भावनिक भावना त्यांनी व्यक्त केली. राजकीय वाटचालीला पूर्णविराम देत समाजसेवेचा नवा अध्याय सुरू करण्याच्या रमेश येवले यांच्या निर्णयाची सध्या परिसरात चर्चा होत आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. आता मोरया सामाजिक ट्रस्टच्या माध्यमातून ते कोणते सामाजिक उपक्रम राबवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते म्हणून नावलौकिक मिळवलेले रमेश भाऊ येवले हे गेल्या काही वर्षापासून आंबेगाव तालुक्याचा राजकारणात सक्रिय झाले होते. अगदी कमी कालावधीत त्यांनी तालुक्यात नावलौकिक मिळवला होता. ते सद्या शिवसेना (शिंदे गट) पक्षात कार्यरत होते. त्यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी सध्या राजकारणाची परिस्थिती पाहता राजकारणात कुठलीही दिशा दिसत नाही, त्यामुळे तात्पुरते थांबण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.




