आंबेगाव तालुक्यातील ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेला राज्यस्तरीय महिला गौरव पुरस्कार


महिला व युवतींच्या सर्वांगीण विकासासाठी दोन दशकांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेच्या कार्याची दखल घेत राज्य महिला आयोगाच्या वतीने संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गार्गी काळे वळसे पाटील यांना राज्यस्तरीय ‘महिला गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. जागतिक महिला दिनानिमित्त शनिवारी (ता.७) मुंबई येथील दादरच्या रवींद्र नाट्य मंदिरात झालेल्या कार्यक्रमात राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रमाणपत्र व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

या कार्यक्रमाला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, मुंबईच्या महापौर रितू तावडे, आमदारऍड मनीषा कायंदे, राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, लक्ष्मण मानकर,पुणे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे , रोहिणी पडवळ, प्रियंका गजमल,यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्था गेली वीस वर्षे महिला व युवतींच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवत आहे. संस्थेच्या पुढाकारातून मुलींचे समुपदेशन करण्यासाठी पुणे शहर पोलीस आयुक्तालय तसेच नारायणगाव व यवत पोलीस ठाण्यात ‘बालस्नेही पोलीस कक्ष’ उभारण्यात आले आहेत. तसेच महिलांना बेडसाईड केअर, ब्युटी पार्लर, टेलरिंग, अन्नप्रक्रिया आदी क्षेत्रांमध्ये मोफत प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

संस्थेच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्यातील ९८ शाळांमधील चार हजारांहून अधिक विद्यार्थिनींना ‘गुड टच – बॅड टच’बाबत जनजागृती करण्यात आली असून ४५० विद्यार्थिनींना स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण देण्यात आले आहे. यापुढे इलेक्ट्रिक टू व्हीलर टेक्निशियन प्रशिक्षण महिलांना देण्याचा संस्थेचा मानस आहे.या पुरस्कारामुळे संस्थेचे कार्य अधिक गतिमान पद्धतीने पुढे नेण्याचा संकल्प असल्याचे गार्गी काळे वळसे पाटील यांनी सांगितले.

१७ वर्षांनंतर पुन्हा राज्यस्तरीय सन्मान

महात्मा गांधी तंटामुक्त अभियानाची प्रभावी अंमलबजावणी व जनजागृती केल्याबद्दल २००९ मध्ये ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेला तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला होता. तब्बल १७ वर्षांनंतर त्यांच्या पत्नी व व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते संस्थेला पुन्हा सन्मान मिळणे हा संस्थेसाठी विशेष योगायोग आहे .”

गार्गी काळे/ वळसे पाटील ( मुख्याधिकारी, ज्ञानशक्ती संस्था मंचर )