निरगुडसर येथे महिला उद्योजिकांना एमएसडीपी प्रमाणपत्र वितरण


ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने आयोजित २० दिवसीय सूक्ष्म कौशल्य उद्यमिता विकास (एमएसडीपी) प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या महिला उद्योजिकांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

अहमदाबादस्थित भारतीय उद्योजकता विकास संस्थान (EDII) व अ‍ॅक्सेंचर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ, पुणे (महाराष्ट्र शासन अंगीकृत) अंतर्गत जिज्ञासा लोकसंचलित साधन केंद्र, मंचर, पुणे यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. प्रशिक्षण काळात महिलांना मसाला उत्पादनांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले. तसेच उत्पादनांना स्पर्धात्मक बाजारपेठ मिळावी यासाठी पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि मार्केटिंग याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन करण्यात आले.

समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच मा. रविंद्र वळसे पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच मा. भाऊसाहेब वळसे पाटील, माजी उपसरपंच मा. आनंदराव वळसे पाटील, ग्रामविकास अधिकारी मा. संपत पांढरे, तंटामुक्ती अध्यक्ष मा. सुरेश टाव्हरे, सुरेश आवारी चेअरमन, विक्रम वळसे, अशोक मेंगडे, माविम पुणेचे मा. आशिष दगडे (DPC), जिज्ञासा CMRC उपाध्यक्षा सविता सैद मॅडम तसेच EDII संस्थेचे मा. भगवान सर व सचिन सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिज्ञासा CMRC व्यवस्थापक मनिषा जारकड यांनी केले. यावेळी मान्यवरांनी महिलांनी उद्योजकतेच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनून कुटुंबाच्या तसेच समाजाच्या प्रगतीत सक्रिय योगदान द्यावे, असे प्रतिपादन केले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत स्वउद्योग उभारण्याचे आवाहनही करण्यात आले. कार्यक्रमास जिज्ञासा CMRC चे पदाधिकारी, व्यवस्थापक, लेखापाल, उपजीविका सल्लागार, सहयोगिनी, CRP तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.