राज्याच्या राजकारणातील स्वच्छ प्रतिमेचा नेता, विकासपुरुष माजी मंत्री मा. दिलीप वळसे पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 


आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर या छोट्याशा गावात जन्म झालेले माजी मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांची आंबेगाव तालुक्याचा विकास पुरुष म्हणून राजाच्या राजकारणात ओळख आहे. राजकारणात प्रामाणिकपणा, संयम, विचारशीलता आणि कार्यतत्परता या गुणांचा संगम म्हणजे मा. दिलीप वळसे पाटील हे नाव. राज्याच्या राजकीय क्षेत्रात एक सुसंस्कृत, दूरदृष्टी असलेले आणि विकासाच्या कामांवर लक्ष केंद्रित करणारे नेतृत्व म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मा. वळसे पाटील यांनी आपल्या राजकीय प्रवासात विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या मग ते गृहमंत्री, ऊर्जा मंत्री, शिक्षणमंत्री, सहकार मंत्री असो वा विधानसभेचे अध्यक्ष म्हणून दिलेली कामगिरी असो. प्रत्येक भूमिकेत त्यांनी पारदर्शकतेचा आणि लोकहिताचा ध्यास घेत त्या पदाला न्याय देण्याचे काम केले आहे.

जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणे, विकासकामांबाबत संवेदनशील दृष्टी ठेवणे, कुठलाही प्रश्न अभ्यासपूर्वक सोडवणे, कार्यकर्त्यांशी नेहमी जवळचा संवाद राखणे हे त्यांच्या कार्यशैलीचे वैशिष्ट्य आहे. त्यांनी आपल्या मतदारसंघात शिक्षण, पाणीपुरवठा, रस्ते व औद्योगिक विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामे केली आहेत. त्यांचा शांत, अभ्यासू व सकारात्मक दृष्टिकोन नव्या पिढीच्या राजकारण्यांसाठी आदर्श ठरत असुन आज त्यांचा वाढदिवस म्हणजे लोकसेवेच्या वाटचालीत आणखी एका नव्या ऊर्जेचा दिवस!

राज्याच्या राजकारणातील स्वच्छ प्रतिमा असलेले नेते म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी सहकारमंत्री दिलीपरावजी वळसे पाटील हेच नाव पुढे येते. ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री, खासदार शरद पवारसाहेब वांचे स्वीय सहायक ते राज्याचे माजी गृहमंत्री, सहकारमंत्री, असा दिलीपराव वळसे पाटील यांचा राजकीय प्रवास आहे. अतिशय कार्यक्षमतेने त्यांनी आतापर्यंत त्यांच्यावर टाकलेल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. संकटकाळातील तारणहार तसेच कायद्याचे ज्ञान असलेले नेते म्हणून दिलीपराव वळसे पाटील ओळखले जातात.

राज्यात गोंधळाची व बिकट परिस्थिती निर्माण राज्यात झाली. अशा प्रत्येक वेळी माजी सहकारमंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांना महत्त्वाची जबाबदारी दिली जाते व ते ती जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडतात. म्हणूनच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व राज्यातील महत्त्वाचे नेते म्हणून दिलीपराव वळसे पाटील यांच्याकडे पाहिले जाते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे एकनिष्ठ म्हणून दिलीपराव वळसे पाटील यांचा उल्लेख केला जातो.

महाविद्यालयीन जीवनापासून दिलीपराव वळसे पाटील यांचा राजकीय व सामाजिक प्रवास सुरू झाला. राजकीय, सामाजिक, सहकारी व शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान आहे. राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र, पुणे या संस्थेमार्फत दिलीपराव वळसे पाटील यांनी आंबेगाव तालुक्याच्या ग्रामीण व आदिवासी भागात तसेच राज्याच्या विविध भागांमध्ये शैक्षणिक संस्थांचे जाळे उभे करून ज्या ठिकाणी जाण्या-येण्याची साधनेही नाहीत, अशा ठिकाणी या संस्था उभ्या केल्या. तेथील विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविला. ग्रामीण व आदिवासी जनतेच्या उन्नतीसाठी दिलीपराव वळसे पाटील यांनी अनेक उपक्रम राबविले.

माजी सहकारमंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांचे शैक्षणिक संस्थांशी निकटचे संबंध आहेत. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, रयत शिक्षण संस्था, भीमाशंकर शिक्षण संस्था यांसारख्या अनेक शिक्षण संस्थांच्या मंडळांवर ते कार्यरत होते. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत ते संचालक म्हणून कार्यरत आहेत. जिल्हा बँकतील त्यांचे योगदान मोठे आहे. सहकारातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे ते संस्थापक आहेत. मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती, शरद सहकारी बैंक, अनुसया महिला नागरी पतसंस्था यांसारख्या आर्थिक पतपुरवठा करणाऱ्या संस्थांची सहकार दिलीपराव वळसे पाटील यांनी उभारणी केली आहे. त्यांच्या माध्यमातून या संस्थांचा कारभार चांगल्या प्रकारे सुरू आहे.

आंबेगाव तालुका खरेदी-विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती, देखरेख संघ यांच्या माध्यमातून दिलीपराव वळसे पाटील यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मालाच्या विक्रीसाठी हक्काचे ठिकाण उपलब्ध केले आहे. सध्या मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून मंचर, घोडेगाव, तळेघर, लोणी, चांडोली या ठिकाणी उपबाजार समितीची उभारणी केली असून, शेतकऱ्यांच्या मालाला त्यांच्याच परिसरात विक्रीसाठी त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले.आहे. आंबेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात त्यांनी दूध संस्थांचे जाळे उभे करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दुग्धव्यवसायाचा नवीन मार्ग निर्माण केला व शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती केली. सध्या आंबेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात दुग्धव्यवसाय होत असून, सहकारी संस्थांबरोबर खासगी संस्थाही मोठ्या प्रमाणावर उभ्या राहिल्या आहेत, त्या संस्थांच्या माध्यमातून लाखो लिटर दुधाची खरेदी-विक्री होत असते. त्यामुळे आंबेगाव तालुक्यातील शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय उभा असल्याचे दिसून येत आहे. दुग्धव्यवसायासाठी कर्जपुरवठा त्यांनी विविध संस्थांच्या माध्यमातून केला, सर्वत्र बेरोजगारी असताना आंबेगाव तालुक्यातील शेतीपूरक व्यवसायांना रोजगार दिला आहे.

संकलन – प्रमोद दांगट (पत्रकार)