स्वाभिमानी मराठा महासंघाच्या पुणे जिल्हा मार्गदर्शक पदी भराडी ता. आंबेगाव येथील प्रगतशील शेतकरी नवनाथ भिमाजी गावडे (मामा) यांची निवड झाली आहे. त्यांच्या निवडीनंतर त्यांच्यावर विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
नवनाथ भि, गावडे यांनी यापूर्वी विविध सामाजिक कामे केली असून मंचर पुणे मुंबई जीप चालक-मालक संघटनेच्या अध्यक्ष, भराड माउली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष, भक्ती शक्ती वारकरी शिक्षण संस्था उपाध्यक्ष, आदर्श गाव भराडी तंटामुक्ती अध्यक्ष या पदावर काम केले आहे. मंचर येथील साई इलेक्ट्रिकल्स अँड होम एक्सेस सुपर मार्केटचे सर्वेसर्वा असून हा व्यवसाय त्यांची मुले निलेश व नितीन गावडे ही सांभाळत आहे. नवनाथ भि, गावडे व्यवसायाबरोबरच सामाजिक कार्यात कार्यरत असून गावच्या विविध विकास कामात जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. स्वाभिमानी मराठा महासंघ हा मराठा समाजासाठी काम करत असून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी, तसेच मराठा समाजाच्या विविध प्रश्न सोडवण्यासाठी संघटना काम करत आहे. मराठा महासंघाच्या वतीने मराठा तरुणांना एकत्र करून त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी काम करणार असल्याचे नवनाथ भि, गावडे यांनी सांगितले.




