वन विभागाच्या जुन्नर विभागांतर्गत असलेल्या जुन्नर, आंबेगाव, शिरुर व राजगुरुनगर या तालुक्यात बिबटयांच्या होत असलेल्या मानवी मृत्यूंबाबत व पशुधनांबाबत उपाययोजना करण्यासाठी माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे मागणीनुसार वनमंत्री गणेश नाईक, वन विभागाचे प्रधान सचिव, प्रधान मुख्य वनसंरक्षक, जिल्हाधिकारी, पुणे, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण व वन विभागाचे अन्य वरिष्ठ अधिकारी यांचे समवेत आज मंगळवार, दिनांक ४ नोव्हेंबर, २०२५ रोजी सकाळी १०:३० वा. मंत्रालयात बैठक संपन्न झाली.
या विषयाबाबत माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी या विषयाबाबत मा.मुख्यमंत्री, मा.उप मुख्यमंत्री व मा.मंत्री, वने यांना सविस्तर पत्र दिलेले असून बिबटयांच्या हल्ल्यांमध्ये जवळपास ५३ व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे. १४५ व्यक्ती गंभीर जखमी झालेल्या आहेत. २६,९७९ पशुधनांचा मृत्यू झालेला आहे. नुकसान भरपाईपोटी २६ कोटी ७२ लाख, ५६ हजार, ७०३ रुपये इतकी नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे. यावरुन हा विषय किती गंभीर आहे. हे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी गेल्या अनेक वर्षांमध्ये उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्यांचा वाढलेला उपद्रव याचे गांभीर्य माननीय मंत्री महोदय यांच्या लक्षात आणून दिले.
याबाबत तातडीने जिल्हा नियोजन समिती मार्फत २ कोटी २३ लाख रुपये पिंजरे खरेदी करण्यासाठी तातडीने उपलब्ध करुन दिलेले असून बैठकीत पुढील प्रमाणे काही निर्णय घेण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी, पुणे यांनी दिलेल्या माहितीनुसार या परिसरात जवळपास २ हजारच्या आसपास बिबट असून त्यापैकी १५०० बिबट वनतारामध्ये स्थलांतरीत करावेत, ए.आय. मार्फत अलर्ट सिस्टिम व सौर ऊर्जा कुंपन याची व्यवस्था करण्याचे निश्चित करण्यात आले, या परिसरात बिबटे पकडण्यासाठी पिंज-यांची गरज असल्यामुळे त्यासाठी १० कोटी रुपये आजच उपलब्ध करुन देण्यात येतील, नरभक्षी बिबट्यास मारण्याची परवानगी वाढवण्याचा निर्णय, बिबट्याचे नसबंदी करण्यासाठी शासनाची शिष्टमंडळ केंद्रीय वनमंत्री यांना भेटणार, आंबेगाव जुन्नर खेड शिरूर तालुक्यातील वन कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणार, या परिसरातून जेवढे बिबटे पकडण्यात येतील. ते पुन्हा या परिसरात सोडले जाणार नाही. बिबट हा प्राणी अनुसूची (१) मध्ये असून तो अनुसूची (२) मध्ये आणण्यासाठी केंद्रीय कायद्यात दुरुस्ती करण्याबाबत केंद्र शासनाला विनंती करण्यात येणार असून यांसह उपरोक्त सर्व निर्णयांचा आढावा व त्या परिसरातील लोकप्रतिनिधींसमवेत चर्चा करण्यासाठी मा.मंत्री, वने हे बुधवार, दिनांक १२ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता विधान भवन, पुणे पुन्हा बैठक घेणार आहेत.




