अवसरी बुद्रुक येथे इंग्रज बैलाचा दशक्रिया विधी कार्यक्रम संपन्न ; दशक्रिया विधी कार्यक्रमाला बैलगाडा क्षेत्रातील मान्यवरांची गर्दी


पुणे जिल्ह्यातील बैलगाडा शर्यतीच्या घाटात घाटाचा राजा म्हणून सतत १५ वर्षे बहुमान मिळवलेल्या इंग्रज बैलाचे दहा दिवसापूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यांचा दशक्रिया विधी कार्यक्रम गुरुवार दि.१६ रोजी पार पडला यावेळी आज ह भ प बाळशीराम महाराज मिंडे यांची प्रवचन रूपी सेवा लाभली. याप्रसंगी वडगाव मावळ, मुळशी, हवेली, भोसरी, मोशी, खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यातील हजारो बैलगाडा मालक उपस्थित होते. यावेळी इंग्रज बैलाचे मालक किशोर हिंगे, किरण हिंगे यांना अश्रू अनावर झाले.

अवसरी बुद्रुक येथील प्रसिद्ध बैलगाडा मालक किशोर हिंगे पाटील यांनी २०१० साली इंग्रज बैल व एक लाख दहा हजार रुपयांना खरेदी केला होता. त्यानंतर सतत पंधरा वर्षे पुणे जिल्ह्यातील बैलगाडा शर्यतीत घाटाचा राजा म्हणून तो नावलौकिक मिळवत होता. अनेक शर्यतीत त्याने मालकाला मोटरसायकली, चार चाकी, ट्रॅक्टरची बक्षीसे मिळवून दिली होती.

इंग्रज बैलाला सहा महिन्यांपूर्वी पायाला जखम झाल्यानंतर हिंगे कुटुंबातील आजी हौसाबाई हिंगे, वडील कोंडीभाऊ हिंगे यांनी बैलाला पोटच्या मुलापेक्षा जास्त जीव लावत त्याला रोज अंघोळ घालणे, त्याचे खाणे पिण्याची जबाबदारी पार पाडली. परंतु दहा दिवसापूर्वी अल्पशा आजाराने इंग्रज बैलाचे निधन झाले. त्याचा दशक्रिया विधी गुरुवारी संपन्न झाला या प्रसंगी हा बाळशिराम महाराज मिंडे यांचे प्रवचन झाले. त्यानंतर पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक विष्णू काका हिंगे, जयसिंगराव एरंडे, शिवाजीराव निघोट, रामकृष्ण टाकळकर, साहेबराव आढळराव यांनी इंग्रज बैलाला श्रद्धांजली वाहिली. या प्रसंगी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विष्णू काका हिंगे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश भोर, सभापती निलेश थोरात, आत्माराम कदम, गणेश तनपुरे, सागर देवाडे, संतोष कबाडी, कैलास गावडे हे यासह बैलगाडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन माजी सरपंच पवन हिले, माजी उपसरपंच सचिन हिंगे, ग्रामपंचायत सदस्य संजय हिंगे, विद्यमान उपसरपंच अनिल हिंगे, सुधीर हिंगे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसेना उपजिल्हाप्रमुख अजित चव्हाण यांनी केले तर आभार निलेश महाराज हिंगे यांनी मानले.