दीपावली सणाची लगबग किराणामाल घेण्यासाठी दुकानांमध्ये महिलांची गर्दी


दिवाळी सण चार दिवसावर आला असल्याने ग्राहक, महिला किराणा दुकानात फराळाचे साहित्य घेण्यासाठी गर्दी करत आहे. तर कापड दुकानात मात्र मंदीचे सावट पाहावयास मिळत आहे. किराणा दुकानात रवा मैदा पिठीसाखर बेसन पीठ तेल तूप इत्यादी साहित्य खरेदी करण्यासाठी महिलांची गर्दी पहावयास मिळत आहे. तालुक्यात दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकऱ्यांना दर महिन्याचा पगार मिळत आहे. तर भीमाशंकर साखर कारखान्याचे वतीने उसाचा शेवटचा हप्ता ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. तसेच कारखान्याच्या वतीने गावोगावी साखर वाटप केली जात आहे. त्यामुळे चालू वर्षी दिवाळीत आर्थिक फायदा झाल्याचे शेतकरी किराणा दुकानात रवा, मैदा, पिठ, साखर तेल तूप व इतर साहित्य घेण्यासाठी गर्दी करत आहे. चालू वर्षी किराणा मालाचे बाजार भाव आवाक्यात आहे तसेच ग्रामीण भागातील काही पतसंस्था, सहकारी बँका सभासदांना दरवर्षी दिवाळीचा किराणा साहित्य वाटप करत असल्याने त्याचा फायदा सुद्धा ग्राहकांना होत असल्याचे पहावयास मिळत आहे. चालू वर्षी रवा मैदा बेसन पीठ डाळी तेल तुपाचे भाव स्थिर असल्याचे दुकानदार नितीन खुडे यांनी सांगितले.