साल ठाकरवाडी येथील पाझर तलावात ज्येष्ठ दांपत्य बुडाले ; महिला वाचली, ज्येष्ठ व्यक्तीचा शोध सुरु


साल ठाकरवाडी ता. आंबेगाव येथे कामावर जात असलेले पती-पत्नी पाय घसरून पाझर तलावात पडल्याची घटना घडली असून या घटनेत देवराम सखाराम पारधी वय ६० हे पाझर तलावात बुडाले असून त्यांचा शोध सुरू आहे. तर त्यांची पत्नी धोंडाबाई देवराम पारधी या बचावल्या आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की देवराम सखाराम पारधी व त्यांची पत्नी धोंडाबाई देवराम पारधी या शेतमजुरीचे काम करतात दररोज नेहमीप्रमाणे ते पाझर तलाव क्रमांक १ वरून साल येथे जात असताना त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने पाय घसरून ते तलावात पडले. त्यावेळी धोंडाबाई देवराम पारधी या दगडाचा आधार घेऊन तलावात थांबल्या तर देवराम सखाराम पारधी हे तलावात बुडाले काही वेळानंतर स्थानिक ग्रामस्थ अशोक किशन गावडे यांनी धोंडाबाई देवराम पारधी यांना पाण्यातून बाहेर काढले व त्यांना पुढील उपचारासाठी घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पाण्यात बुडालेले देवराम सखाराम पारधी यांचा शोध न लागल्याने सकाळपासून त्यांचा शोध सुरू आहे. घटनास्थळी घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सागर पवार, आंबेगाव चे तहसीलदार संजयजी नागटिळक घटनास्थळी उपस्थित झाले आहेत. निसर्ग साहस संस्थेचे धनंजय कोकणे व त्यांचे सहकारी तसेच सर्व तलाठी, कोतवाल स्थानिक ग्रामस्थ देवराम पारधी यांचा शोध घेत आहे. गेल्या दोन दिवसापासून घोडेगाव व वरच्या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असून ओढून आले तलाव तुडुंब भरून वाहू लागले आहेत त्यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली असल्याचे स्थानिक ग्रामस्थ सांगत असून नागरिकांनी नदी, ओढे, नाले, तलाव या ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.