शिकारीचा पाठलाग करत बिबटया आला दारात ; ज्येष्ठ दांपत्य थोडक्यात बचावले


आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर ( दांगटवस्ती ) येथील घटना ; पिंजरा लावण्याची मागणी 

निरगुडसर ता. आंबेगाव येथील दांगटवस्ती येथे शिकारीच्या शोधात मांजराचा पाठलाग करताना बिबट्या घराच्या दारात आला असल्याची घटना सोमवार दि. ३० रोजी रात्री ८ वाजता घडली आहे. घरात असलेल्या जेष्ठ दांपत्य यांनी जोरजोरात आरडा ओरडा केल्याने बिबट्या दरवाजातूनच माघारी फिरल्याने ज्येष्ठ दाम्पत्य थोडक्यात बचावले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की निरगुडसर दांगटवस्ती येथे सुरेश त्रिपती दांगट वय ६५ व त्यांची पत्नी ताराबाई सुरेश दांगट वय ६० हे राहत असून त्यांची मुले कामानिमित्त मुंबई या ठिकाणी असतात. रात्री आठ वाजताच्या दरम्यान सुरेश दांगट व त्यांची पत्नी घरात बसले असताना त्यांची पाळलेली दोन मांजरे घराबाहेर होती. घराच्या शेजारी असलेल्या उसाच्या शेतातून शिकारीच्या शोधात आलेल्या बिबट्याने त्यांच्या मांजरांचा पाठलाग केला. त्यावेळी मांजरे घरात पळाली त्याबरोबर बिबट्या देखील मांजरांच्या मागे घराच्या दारापर्यंत पळत आला. सुरेश दांगट घरातून उठून बाहेर जाण्यासाठी निघाले असता त्यांची पत्नी ताराबाई दांगट यांनी त्यांना दरवाजात बिबट्या आहे बाहेर जाऊ नका असे सांगत जोर जोरात आरडाओरडा केला तसेच घरातील काठीने दरवाजावर जोरजोरात मारत मोठा आवाज केल्याने बिबट्या निघून गेला. मात्र घडलेल्या प्रकाराने दांगट पती-पत्नी खूप घाबरले होते. देवाची कृपा म्हणून आम्ही वाचलो असे ताराबाई दांगट यांनी सांगितले.

दांगटवस्ती या परिसरात बिबट्याचे वास्तव्य असून दोन दिवसापूर्वी सुरेश दांगट यांच्या घराच्या पाठीमागे शेतात बिबट्या पाहिल्याचे ताराबाई दांगट यांनी सांगीतले. या अगोदर सुरेश दांगट यांची दोन पाळीव कुत्री, एक कालवड, शेजारी राहणारे शिवाजी दांगट यांचे तीन पाळीव कुत्री तर पुष्पाबाई दांगट यांचा एक पाळीव कुत्रा बिबट्याने आतापर्यंत ठार केले आहे. याबाबत माजी उपसरपंच आनंदराव वळसे पाटील यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली असता वनरक्षक अश्विनी डफळ, वनकर्मचारी दशरथ मेंगडे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे. सदर ठिकाणी पिंजरा लावावा अशी मागणी येथील शेतकरी शिवाजी दांगट, कारभारी दांगट, बाळासाहेब दांगट, विशाल दांगट यांनी केली आहे.

प्रमोद दांगट – प्रतिनीधी