मंचर पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार पुणे व अहिल्यानगर जिल्हयातुन दोन वर्षाकरीता हद्दपार


हद्दपार केलेल्या तुषार टेकेवर ७ गुन्हे दाखल ; मा. उपविभागीय अधिकारी सो, जुन्नर-आंबेगाव उपविभाग यांनी दिले आदेश

मंचर पोलीस स्टेशन हद्दीतील वडगाव काशिंबेग ता. आंबेगाव येथे राहणारा सराईत गुन्हेगार डेली उर्फ तुषार शांताराम टेके वय २७ वर्षे याचेवर खूनाचा प्रयत्न, खंडणी, गर्दीमारामारी, अपहरण, अवैध वाळूचोरी, यासारखे गंभीर स्वरूपाचे एकूण ७ गुन्हे दाखल असून सदर गुन्हेगारास पुणे व अहिल्या नगर जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आले असल्याची माहिती मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी दिली.

डेली उर्फ तुषार शांताराम टेके वय २७ वर्षे रा. वडगाव काशिंबेग ता आंबेगाव याच्यावर विविध गुन्हे दाखल असून त्याला वेळोवेळी गुन्हयात अटक करण्यात आली असता तो जामीनावर आलेवर प्रतिबंधात्मक कारवाई देखिल करण्यात आली आहे. परंतू त्याचे वर्तनूकीत कोणत्याही प्रकारची सुधारणा होत नव्हती, सामान्य लोकांचे मनात त्याचेविषयी भिती निर्माण झाली होती. त्याचेवर वेळीच कायदयाचे बंधन राहावे तसेच त्याचे गुन्हेगारीला, विघातक कृत्यांना आळा बसावा याकरीता डेली उर्फ तुषार शांताराम टेके याला दोन वर्ष हद्दपार करणेबाबत पोलीस निरीक्षक मंचर पोलीस स्टेशन यांनी, पोलीस अधिक्षक यांचे मार्फतीने मा. उपविभागीय अधिकारी सो, जुन्नर-आंबेगाव उपविभाग, मंचर यांचे कार्यालयात प्रस्ताव पाठविला होता. सदर प्रस्तावर मा. उपविभागीय अधिकारी सो, जुन्नर-आंबेगाव उपविभाग यांनी सुनावणी घेवून सूनावणीअंती दिनांक १३/६/२०२५ रोजी डेली उर्फ तुषार शांताराम टेके वय २७ वर्षे रा. वडगाव काशिंबेग ता. आंबेगाव याला पुणे व अहील्यानगर जिल्हयांमधून दोन वर्षाकरीता हद्दपार केल्याचे आदेश पारीत केले आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक संदिपसिंग गिल्ल, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर (स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रा), पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ सहा पो. नि. सुनिल बडगुजर, नितीन बनकर, पोलीस हवालदार संजय नाडेकर, शेखर भोईर, नंदकुमार आढारी, पोलीस अंमलदार अविनाश दळवी, अजित पवार, योगेश रोडे, यांनी केली आहे.

प्रमोद दांगट.. तालुका प्रतिनिधी