शालेय विद्यार्थ्यांना, तरुणांना करवंद विक्रीतून मिळणारे थोडेफार पैसेही यंदा मिळणार की नाही अशी परिस्थिती
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी डोंगरी भागात उन्हाळ्यात डोंगर भागात येणारे करवंद विक्री करून तरुण, शालेय विद्यार्थी आपल्या शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी करवंदे विक्रीतून थोडेफार पैसे कमवत असतात. तसेच अनेक आदिवासी बांधव करवंद तोडून हे घोडेगाव, मंचर या ठिकाणी विक्रीसाठी आणत असतात. त्यातून थोडाफार कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असतो मात्र यावर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे करवंदाची झाडे झोडपली गेली असून करवंद फळाची मोठ्या प्रमाणात गळती झाल्याने यावर्षी करवंद व्यवसायातुन मिळणारे उत्पन्न घटनार असल्याने आदिवासी बांधवांनी चिंता व्यक्त केली आहे.
आंबेगाव तालुक्यातील आदिवासी डोंगरी भागात मोठ्या प्रमाणात करवंदाची झाडे झाडे असल्याने दरवर्षी आदिवासी बांधव, तरूण, शालेय विद्यार्थी डोंगरावर फिरून करवंदे तोडून गोळा करून जवळच्या बाजारपेठेत घोडेगाव, मंचर या ठिकाणी विक्रीसाठी आणत असतात. तसेच पश्चिम आदिवासी भाग हा निसर्गाने निसर्गरम्य असल्याने व या ठिकाणी भीमाशंकर अभयारण्य, श्रीक्षेत्र भीमाशंकर, डिंभे धरण, धबधबे, असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक पावसाळ्यात या परिसरात पर्यटनासाठी येत असतात त्यावेळी रस्त्याच्या दुतर्फा आदिवासी बांधव, तरूण मुले करवंद विक्रीसाठी बसत असतात. डोंगरची काळी मैना म्हणून प्रसिद्ध असलेल्या करवंद विक्रीतून अनेक आदिवासी बांधवांचे कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असतो मात्र यावर्षी मे महिन्यातच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने करवंदाची झाडे झोडपली गेली असून करवंदाची फळे गळून पडली आहेत त्यामुळे करवंदाचे उत्पन्न घटले आहे. करवंदाचा सीजन चालू होण्या अगोदरच करवंदे पडल्याने आदिवासी बांधवांनी चिंता व्यक्त केली आहे.