रेकी करुन मंदीरात चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला अटक


आंबेगाव तालुक्यातील लौकि येथील राणूबाई देवीचे मंदिर व धामणी येथील काळूबाई मंदीरात केली होती चोरी

आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील ग्रामीण भागातील मंदिरात चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथकाने अटक केली असून त्याच्या जवळुन चोरीचे ४ गुन्हे व १ किलोग्रॅम चांदी, अडीच ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण १,५०,०००/- लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसात आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील ग्रामीण भागात असणाऱ्या मंदिरांमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी सदर गुन्ह्यांचा तपास लावण्याचे सूचना पथकास दिल्या होत्या. आळेफाटा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना आळेफाटा, मंचर, पारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच वर्णनाचे कपडे परिधान केलेला चोरटा सर्वत्र चोरी करत असल्याचे समजले. सदर सीसीटीव्ही फुटेज मधील संशयित आरोपीचे फुटेज गोपनीय बातमीदाराला दाखविण्यात आले त्यानुसार गोपनीय बातमी मिळालेल्या माहितीनुसार सदर संशयित हा संतोष एकनाथ बर्डे रा.अकलापूर संगमनेर इथला असल्याचे समजले. दि. ३० रोजी पोलीसांनी त्याला आळेफाटा परिसरातुन ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी केला असता त्याने जुन्नर तालुक्यातील काळवाडी, येथील कालिका माता मंदिर, धोलवड भवनीनगर येथील अंबिका माता मंदिर, आंबेगाव तालुक्यातील लौकि येथील राणूबाई देवीचे मंदिर धामणी येथील काळुबाई मंदिरातून चांदी व सोन्याचे दागिने रोख रक्कम आधी ऐवजाची चोरी केली होती. अटक आरोपी याच्याकडे एकूण चार पुण्याची उकल झाली असून पोलिसांनी एक किलोग्रॅम चांदीचे दागिने, २.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, मोटरसायकल असा एकूण दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्रकुमार चौधर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, आळेफाटा पोलीस ठाण्याचे पो.नि दिनेश तायडे, स्थागुशाचे अंमलदार दिपक साबळे, संदिप वारे, राजु मोमीण, अक्षय नवले, विक्रम तापकीर, निलेश सुपेकर, यांनी केली आहे.

प्रमोद दांगट – प्रतिनिधी